— विशेष राजकीय विश्लेषण | मिशन पत्रकारिता
मुंबई | 16 जून २०२५ —
राजकारणात पराभव हा अंतिम नसतो… आणि विजय हा केवळ आकड्यांचा खेळ नाही. २०२४ च्या जोगेश्वरी विधानसभा निवडणुकीत मात्र १५४१ मतांनी पराभूत झालेल्या सौ. मनिषा वायकर यांची कथा ही आकड्यांच्या पलिकडील एक विलक्षण आणि अंतःकरण स्पर्शणारी गाथा आहे — एका शिक्षिकेची, एका पत्नीची, एका आईची, आणि आजच्या घडीला एक जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या नेत्या ची.
एक अनपेक्षित सुरुवात -
राजकारण मनिषा वायकर यांच्यासाठी कधीच ध्येय नव्हते. त्या शिक्षिका होत्या — शिस्तप्रिय, अभ्यासू आणि समाजकार्याची तळमळ मनात ठेवणाऱ्या. त्यांच्या पती, खासदार रविंद्र वायकर, अनेक वर्षे विधानसभेतील प्रमुख चेहरा राहिले. त्यांच्या प्रत्येक भाषणात एक गोष्ट हमखास असायची — "माझ्या कुटुंबातील कुणीही कधीही राजकारणात येणार नाही." मनिषाताईंसाठीही हीच रेषा ठरली होती. पण नियतीच्या हस्ताक्षरांना कुणीही ओळखू शकत नाही.
सर्वांनी माहीतच आहे की 2022-23 मध्ये ईडीच्या छाप्यांनी वायकर कुटुंबाला झकझकून टाकले. पक्षातील अंतर्गत कुरघोड्या, विरोधकांचे आरोप, आणि गमावलेली राजकीय जमीन — या साऱ्या संकटांमध्ये वायकर कुटुंब उभं राहिलं एका नव्या आधारावर… आणि तो आधार होता मनिषा वायकर.
शेवटी शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी दिली, आणि एका स्त्रीने घराच्या उंबऱ्याबाहेर पाऊल टाकून थेट निवडणूक रिंगणात प्रवेश केला. केवळ एक उमेदवार नाही, तर एक प्रतीक म्हणून. त्यावेळी मैदानात एकूण २१ पुरुष उमेदवार होते… आणि फक्त एक स्त्री – मनिषा वायकर. पण ही लढाई केवळ मतांची नव्हती. ती एकटी महिला असल्यामुळे प्रत्येक राजकीय गटाने फक्त तिला हरवण्यासाठी युती केली. हे वैयक्तिक नव्हतं… हे एक ठरवलेलं राजकीय षडयंत्र होतं.
जनता कोणाच्या बाजूला होती?
मनिषाताईंनी प्रचाराच्या दरम्यान जो संवाद लोकांशी साधला, त्यात दिखावा नव्हता, केवळ अनुभव, प्रामाणिकपणा आणि एक आईसारखी काळजी होती. या प्रचारादरम्यान त्यांचे जोगेश्वरीच्या घराघरांशी जे मनाने आणि माणसांनी जोडलेलं नातं तयार झालं, त्याचा निकाल म्हणजे — ७५,५०३ मते. फक्त काही दिवसात झालेली ‘जनता’ विरुद्ध ‘संपूर्ण राजकीय यंत्रणा’ अशी लढाई.
निवडणुकीच्या निकालादिवशी जेव्हा अनंत ऊर्फ बाला नर (उद्धव गट) यांचा विजय जाहीर झाला, अनेकांनी त्या पराभवाला विजय म्हणायला सुरुवात केली. कारण, ही लढाई जिंकण्यासाठी कोणी निवडणूक लढलीच नव्हती — ही निवडणूक होती फक्त मनिषा वायकरला हरवण्यासाठी. सर्व पक्ष, अपक्ष, जातीय समीकरणं, पैशाचा पाऊस — सगळं एका स्त्रीच्या विरोधात. पण तरीही ती १५४१ मतांनीच हरली!
‘वायकरांची बायको’ ते ‘जोगेश्वरीची मुलगी’
जेव्हा श्री. रविंद्र वायकर आमदार होते, तेव्हा लोक त्यांच्या भाषणासाठी जमायचे. पण आज मनिषा वायकर सभेत बोलतात तेव्हा लोक ऐकण्यासाठी नाही, तर जोडून घेण्यासाठी येतात. ती त्यांच्या भावना बोलते, त्यांच्या वेदना समजते आणि त्यांच्यासाठी उभी राहते. ती आता कोणाची "पत्नी" राहिलेली नाही... ती स्वतःचं एक नाव बनली आहे – ‘मनिषाताई’ ती वायकरांच्या मनावर राज्य करणारी होती… आज जोगेश्वरीच्या जनतेच्या हृदयावर राज्य करतेय.
या निवडणुकीत मतांनुसार कदाचित त्या हरल्या, पण लोकांच्या मनात त्या कधीच हरल्या नाहीत. या लढाईने सिद्ध केलं की, एकटी असली तरी ती निर्भय होती… आणि जनतेच्या पाठिंब्याने अजोड होती. आज ती एक राजकारणी नाही, तर एक प्रेरणा आहे — त्या प्रत्येक महिलेसाठी जिच्यासाठी घर, समाज आणि स्वतःची ओळख समतोल राखणं हीच लढाई असते. ही एक निवडणूक नव्हती, हे एक युगप्रवर्तक संघर्ष होतं. कारण जेव्हा सगळे एकत्र एका स्त्रीला हरवण्यासाठी उभे राहतात… आणि ती फक्त १५४१ मतांनी हरते — तेव्हा ती हार नसते, ती लोकशाहीच्या काळजातली जिंक असते.
Post a Comment