0

— मिशन पत्रकारिता विशेष प्रतिनिधी अहवाल

मुंबई | सोमवार, १६ जून
    मुंबईत पावसाळा सुरू होताच एका बाजूला उकाड्यापासून दिलासा मिळतो, पण दुसऱ्या बाजूला बिल्डरांच्या बेफिकीरीमुळे हा पाऊस अनेक कुटुंबांसाठी शोकांतिका ठरतो आहे. आज जोगेश्वरी (पूर्व) येथील नटवर नगर रोड क्रमांक १ वर ‘देवभूमी’ या नव्याने उभारल्या जात असलेल्या इमारतीचा मलबा अचानक कोसळल्याने दोन ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाल्या.

    जखमी महिलांची नावे पुढीलप्रमाणे – सौ. अरलीन पॉल (वय ५८ वर्षे) – ज्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे. तर सौ. सुगंधा जगन्नाथ कदम (वय ६३ वर्षे) – ज्यांच्या हाताला आतून गंभीर इजा झाली आहे व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    ही दुर्घटना दुपारी सुमारे १२:१५ वाजता घडली. मुसळधार पावसात माती, सिमेंट व लोखंडाच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिला वेदनांनी विव्हळत होत्या. स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तत्काळ मदतीला धाव घेत त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले.  दुर्दैवाची गोष्ट म्हणजे घटनास्थळी उपस्थित असलेल्या बिल्डरच्या कामगारांनी जखमी महिलांची मदत करण्याऐवजी स्वतःच्या बचावासाठी मलबा हटवण्यातच आपली ऊर्जा खर्च केली.

    दरम्यान, फायर ब्रिगेड, पोलीस व ॲम्ब्युलन्स सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक शिवसेना विभागप्रमुख श्री. ज्ञानेश्वर सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दोन्ही महिलांना हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात पोहोचवले.  सोबत त्त्यांयांचे सहकारी श्री. संतोष भोसले, सचिन पाटील, सौ. तेली, व विनायक यादव, यांनी  रुग्णालयात सर्व औपचारिकता पूर्ण करून नातेवाईकांना आवश्यक ती मदत केली. या घटनेत सध्या कोणताही मृत्यू झाल्याची नोंद नाही, मात्र श्रीमती अरलीन पॉल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


    दुर्दैवाची बाब म्हणजे ही घटना अपवाद नाही. याआधीही जोगेश्वरी स्टेशन रोडवर मलकानी बिल्डर्सच्या AIM गार्डन प्रकल्पाच्या इमारतीचा मलबा चालत्या ऑटो रिक्षावर कोसळला होता, ज्यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.

या सतत घडणाऱ्या दुर्घटनांनी गंभीर प्रश्न उभे केले आहेत – "मुंबईत सामान्य नागरिकांच्या जीवाला काही किंमत उरली आहे का?" "दर पावसात अशा मृत्यूकांडाचं सत्र सुरूच राहणार का?" 
मिशन पत्रकारिता संस्थेने या प्रकाराला जबाबदार असलेल्या बिल्डरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘देवभूमी’ प्रकल्पाच्या बिल्डरविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. या मागणीला आता स्थानिक खासदार श्री. रविंद्र वायकर यांनी पाठिंबा दिला असून, त्यांनी दोषींवर कडक कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

मुंबईतील पावसाळा आणि बांधकाम स्थळांवर सुरक्षेचा अभाव पाहता, बिल्डरांची बेफिकिरी आता जीवघेणी ठरत आहे. हे केवळ मलब्याचे ढिगारे नाहीत, तर ही कोसळती व्यवस्था आहे, ज्याखाली सामान्य जनतेच्या सुरक्षेचा अंत होताना दिसतो आहे.  ही माहिती मिशन पत्रकारिता टीम कडून जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर आपणही एखाद्या दुर्घटनेचे, अन्यायाचे वा बेपर्वाईचे साक्षीदार असाल, तर आमच्याशी संपर्क साधा — कारण तुमचा आवाज ऐकला गेला पाहिजे, तो दबला जाऊ नये.



Next
Newer Post
Previous
This is the last post.

Post a Comment

 
Top