मुंबई : व्यापार विभागाच्या जनजागृतीसाठी शिवसेना व्यापार विभाग (जोगेश्वरी विधानसभा) तर्फे आज विशेष माहिती अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत शिवसेना आणि महायुती सरकारचे खासदार श्री. रविंद्र वायकर यांनी प्रत्यक्ष दुकानदारांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि नुकत्याच झालेल्या जीएसटी दरकपातीविषयी सविस्तर माहिती दिली.
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी नुकतेच जीएसटीचे दर मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा आणि स्तरही घटविण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे व्यापारी वर्गालाच नव्हे तर ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळणार असून हा खऱ्या अर्थाने बचतोत्सव ठरणार आहे. स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार करण्याचे हे धोरण असून सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मंगळवार, दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी खासदार श्री. वायकर यांनी जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळील नवलकर मार्केट तसेच गुंफा रोडवरील विविध दुकानदारांना भेट दिली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जीएसटी दरकपातीची माहिती व्यापाऱ्यांना दिली तसेच त्यांचे प्रश्न, अडचणी आणि सूचना जाणून घेतल्या. यावेळी श्री. वायकर यांनी व्यापाऱ्यांचा विश्वास व्यक्त करत सांगितले की, “व्यापारी वर्ग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. महायुती सरकार नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहील. व्यापाऱ्यांनी दिलेला पाठिंबा हा आमच्यासाठी प्रेरणादायी असून पुढेही तो असाच कायम राहील.”
व्यापाऱ्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आणि केंद्रातील आघाडी सरकार व महाराष्ट्रातील महायुती सरकारचे तसेच खासदार श्री. रविंद्र वायकर यांचे मन:पूर्वक आभार मानले.
यावेळी विभागप्रमुख श्री ज्ञानेश्वर सावंत, मनोज सातारकर, शिवसेना उद्योग व रोजगार विकास मंच व व्यापार विभागाचे अध्यक्ष शैलेश जयस्वाल, व्यापार विभागाचे जोगेश्वरी विभाग अध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, सुभाष साळवी, उमेश कदम, भाई मिर्लेकर, कृष्णा टोणपे, अंबाजी ज्वेलर्सचे हेमंत जैन आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
या माहिती अभियानामुळे जोगेश्वरीतील व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून केंद्र सरकारच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.



Post a Comment